लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित, कदमवाकवस्तीतील आंदोलन यशस्वी


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी पाठवलेल्या शिष्ट मंडळाने उपोषणस्थळी भेट देत सकारात्मक भूमिका मांडली आणि आवश्यक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

या शिष्टमंडळात नायब तहसीलदार मयुर बनसोडे, मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे तसेच ग्राम महसूल अधिकारी महेश वाघमारे यांचा समावेश होता. त्यांनी बाधित नागरिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देत लवकरच मदत मिळेल, असे स्पष्ट केले.उपोषणाला लोणी काळभोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी पाठिंबा दर्शवला.

तसेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपोषणस्थळी उपस्थित होते. यावेळी उदय काळभोर, चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, उपसरपंच नासीर पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

उपोषण यशस्वी झाल्यानंतर माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “जनतेच्या न्याय व हक्कासाठी भविष्यातही गरज पडल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबू. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने लढत राहू”.असे म्हटले.प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, लवकरच बाधितांना नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!