कर्ज काढून पेरलं, पण अंकुरच फुटला नाही; निकृष्ट बियाण्यांनी शेतकरी दुबार पेरणीच्या विळख्यात

अकोला : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी केली; मात्र पेरणीनंतर पंधरा दिवस उलटूनही अनेक शेतांत उगवण झालेली नाही. वेळेवर पाऊस पडूनही अंकुर न फुटल्याने शेतकऱ्यांचा संशय निकृष्ट किंवा बोगस बियाण्यांकडे वळला असून कृषी विभागाकडे तक्रारींचा पाऊस पडत आहे.

यंदा चांगल्या उत्पादनाच्या आशेने शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन बियाणे, खते आणि मशागतीवर मोठा खर्च केला. मात्र उगवणच न झाल्याने आता त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. नव्याने बियाणे खरेदी, मशागत आणि मजुरी यासाठी पुन्हा खर्च करावा लागणार असल्याने आर्थिक ताण वाढला आहे. पेरणी उशिरा झाल्यास उत्पादन घटण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
हा प्रश्न राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. भाजप आमदार हरिष पिंपळे यांनी ‘अंकुर सीड’च्या चारू तूर, ‘न्यूझीलम’ व ‘मंगलम’च्या कपाशी बियाण्यांसह विविध सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली. दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून बाधित शेतांचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर मकोकाखाली कारवाई करण्याची मागणी केली आहे. कृषी विभागाने नमुने तपासणीसाठी घेतले असून अहवालानंतर पुढील कारवाई अपेक्षित आहे. शेतकरी मात्र तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत..
