पोलीसांना आमची टीप देतो म्हणत शेतकऱ्याला ५ जणांकडून शिवीगाळ करून बेदम मारहाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सितादेवी नगर परिसरात काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. तु पोलीसांना आम्ही दारू पीत बसल्याची टीप देतो, तुला लई माज आला आहे का? असे म्हणत एका शेतकऱ्याला 5 जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहीत जवळकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाचही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण शंकर गावडे (वय 19), आदित्य संतोष इंगोले (वय 24), राकेश गायकवाड, आर्यण चव्हाण व सार्थक जवळकर (सर्व रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी रोहीत जवळकर हे आळंदी म्हातोबाची परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. जवळकर हे शेती करतात. ते त्यांच्या गोठ्यात काम करीत होते. तेव्हा आरोपी करण गावडे व आदित्य इंगोले हे तेथे आले. तु पोलीसांना आम्ही दारू पीत बसल्याची टीप देतो, तुला लई माज आला आहे का? असे म्हणत फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धारधार शस्त्र दाखवत धमकी दिली.

यानंतरआरोपी घटनास्थळावरून निघून गेले. नंतर रोहीत जवळकर यांच्या गोठ्यावर आरोपी करण गावडे, आदित्य इंगोले, राकेश गायकवाड, आर्यण चव्हाण, व सार्थक जवळकर हे पुन्हा आले. आरोपींनी फिर्यादी यांना हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या महींद्रा ट्रक्टरच्या हेडलाईट व बोनटवर धारधार शस्त्राने मारुन तोडफोड करुन नुकसान केले.

तसेच करण गावडे व आदित्य इंगोले यांनी फिर्यादी यांच्या आईला देखील शिवीगाळ केली. आरोपींनी माघारी जाताना फिर्यादी व त्यांच्या आईला धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी आदित्य इंगोले, राकेश गायकवाड व आर्यण चव्हाण यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. उर्वरीत आरोपींच्या मागावर पोलिसांचे एक पथक आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करीत आहेत. या घटनेमुळे याठिकाणी दहशदीचे वातावरण निर्माण केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!