“हॉस्टेलमध्ये मुलींवर मारहाण व अत्याचार सुरू आहे” असा खोटा कॉल; उरुळी कांचनमध्ये पोलिसांची धावपळ, एकावर गुन्हा दाखल

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात डायल ११२ आपत्कालीन सेवेला खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका विकृतावर उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विजय रमेश जाधव (वय ३९, रा. सटवाई चौक, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकारणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश रभाजी रासकर (वय २३) यांनी फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर येथील हॉस्टेलमधील मुलींवर अत्याचार सुरू असल्याचा खोटा कॉल करून पोलीस यंत्रणेला धावपळ करायला लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २१) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश रासकर हे डायल ११२ च्या कर्तव्य बजावत होते. यावेळी आरोपी विजय जाधव याने त्याच्या मोबाईलवरून डायल ११२ वर कॉल केला. “इंदिरा नगर येथील तुपे बिल्डिंग हॉस्टेलमधील मुलींना मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार सुरू आहे,” अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस पथक आणि अंमलदार पोलीस हवालदार लोखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, इंदिरा नगर, तुपे वस्ती परिसरात कसून चौकशी आणि पाहणी केली असता, तिथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, पोलीस पथकाने खात्री केल्यानंतर कॉलर विजय जाधव याला अधिक माहितीसाठी वारंवार फोन केला. मात्र, त्याने पोलिसांना कोणतीही माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून सदर व्यक्तीने डायल ११२ वर जाणूनबुजून खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीने केवळ पोलिसांची दिशाभूल केली नाही, तर आपत्कालीन सेवेचा गैरवापर करून सरकारी वेळ आणि मनुष्यबळ वाया घालवले. आरोपीकडून यापूर्वीही अशा प्रकारचे खोटे कॉल करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 217 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.