जळगावच्या माजी महापौराच्या फार्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर ; परदेशी नागरिकांची फसवणूक, 8 जण ताब्यात


जळगाव : मंत्री गुलाबराव पाटलांचे जवळचे सहकारी आणि माजी,महापौर ललित कोल्हे यांच्या फार्महाऊसवर पोलिसांनी छापा मारल्याची धक्कादायक घटना घडली. या कारवाईत बनावट कॉल सेंटर कार्यरत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी 8 जणानां ताब्यात घेतले आहे. तसेच परदेशातील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

जळगाव शहरालगत ममुराबाद रोडवरील एका फॉर्महाऊसवर बनावट कॉल सेंटर चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या कॉल सेंटरमधून विविध देशांतील नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या बँक खात्यांमधून पैसे उकळण्याचं काम केलं जात होतं. हे कॉल सेंटर परदेशी ग्राहकांना भासवायचं की, ते एका मोठ्या नामांकित ऑनलाइन कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती गोळा करून, वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी आर्थिक फसवणूक केली जात होती.तसेच कोलकाता व विविध राज्यांतील तरुण येथे पगारावर काम करत असल्याचे समोर आले. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाईन कंपन्यांची नावे सांगून फसवणुकीचे प्रकार होत असल्याचा खुलासा झाला.

साधारण 20 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या कॉल सेंटरमधून अनेक परदेशी नागरिकांची लाखो रुपयांत फसवणूक झाल्याचा अंदाज असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या संदर्भातील गुन्हा जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलिसांनी एल. के. नावाच्या फॉर्महाऊसवर छापा टाकून ३१ लॅपटॉप्स आणि दोन चालू संगणक जप्त केले. विशेष म्हणजे हे कॉल्स मुख्यतः रात्रीच्या वेळी केले जात होते, जेणेकरून परदेशी वेळेनुसार त्यांचा फसवणुकीचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा. दरम्यान या प्रकरणाचा सूत्रधार मुंबईतून सर्व हालचाली नियंत्रित करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल आहे. सध्या पोलिसांनी सर्व उपकरण ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!