मिसिंग लिंक’वरून फडणवीस आक्रमक; प्रकल्पाचं केलं कौतुक, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना दिला इशारा..

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरून टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर काही जणांनी सरकारवर केलेल्या टीकेवर त्यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली.

फडणवीस म्हणाले की, मिसिंग लिंकवरील दुर्घटनेनंतर अनेकांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली. मात्र, सरकारने तातडीने काम करून अवघ्या 18 तासांत या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू केली.
“माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका,” असे आवाहन करत फडणवीस यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. भविष्यातही मिसिंग लिंकचा उल्लेख करताना या प्रकल्पामागील मेहनत आणि नाव लक्षात ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरड कोसळण्याच्या घटनेतून काही महत्त्वाचे धडे मिळाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आयआयटीमधील तज्ज्ञांच्या मदतीने नवीन उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

फडणवीस यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाचे महत्त्व सांगताना हा केवळ रस्ता नसून एक अभियांत्रिकी चमत्कार असल्याचे म्हटले. भारतातील उंच केबल स्टेड ब्रिज आणि जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असलेल्या या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दरड कोसळताना ती बोगद्याच्या बाहेरील भागावर आली होती. बोगद्याच्या सुरक्षिततेला कोणताही मोठा धोका निर्माण झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांनी आपत्कालीन बटण दाबल्यानंतर काही मिनिटांत मदत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
“काही लोकांनी प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, मात्र प्रशासनाने तातडीने काम करून वाहतूक सुरळीत केली,” असे सांगत फडणवीस यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाचे समर्थन केले.