पावसाने साथ सोडली, शेतकऱ्यांचा बांधावरच आक्रोश; फडणवीसांचा मोठा शब्द, दोन दिवसांत दुष्काळाचा निर्णय

लातूर : पावसाने दडी मारल्याने लातूरसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. शेतातील उभी पिके करपली, विहिरी-नद्या-नाले कोरडे पडले आणि जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आपल्या व्यथा मांडताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा, निलंगा आणि खरोसा परिसरातील परिस्थिती जाणून घेतली. यंदा लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांवर राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या हिरव्या शेंगांमध्ये दाणे भरले नसल्याचेही त्यांनी पाहणीदरम्यान नमूद केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय काढला जाईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

केवळ पंचनाम्यांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवून ठेवले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने सरसकट मदत देण्याची भूमिका सरकारने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिके घेता यावीत, यासाठीही मदत केली जाणार आहे. दुष्काळाची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


“काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठिशी”
शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार त्यांच्या पाठिशी असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला. पुढील तीन-चार महिने आव्हानात्मक असतील, त्यामुळे या संकटात एकमेकांना सांभाळून पुढे जावे लागेल, असे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा आणि आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
कर्जमाफी आणि वीजबिलाबाबतही मोठी माहिती
दुष्काळाच्या संकटासोबत शेतकऱ्यांवरील कर्जाचा भारही सरकारच्या लक्षात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आधी जाहीर केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, कर्जमाफीचे पैसे पूर्ण दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे जुने वीजबिल माफ करण्यात आले असून ही रक्कम पुन्हा वसूल केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलसंधारणातून रोजगाराचीही तयारी
दुष्काळावर तात्पुरती मदत देण्यासोबतच दीर्घकालीन उपाययोजनांवरही सरकारचा भर राहणार आहे. जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार असून त्यातून रोजगारनिर्मितीलाही चालना दिली जाईल. पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी अधिक काळ साठवून ठेवता यावे, यासाठी या कामांचा उपयोग होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडून मदत मिळण्याची वाट न पाहता तातडीची मदत देण्याची भूमिका घेतली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याची तयारी करण्यात आली असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याला प्राधान्य देण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्राकडे स्वतंत्र मदतीचा प्रस्तावही पाठवला जाणार आहे.
लातूरच्या बांधावर शेतकऱ्यांच्या डोळ्यातील चिंता पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेला दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय आणि सरसकट मदतीचा शब्द आता प्रत्यक्षात कधी उतरतो, याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.