बीडमध्ये खळबळ! गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने बॉयफ्रेंडचा पारा चढला, केलं भयंकर कृत्य…

बीड : बीड जिल्ह्यातील स्वराज्यनगर भागात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षे प्रेमसंबंधात असलेल्या एका तरुणाने केवळ फोन न उचलल्याच्या कारणावरून आपल्या २५ वर्षीय प्रेयसीच्या घरात पहाटे घुसून तिला मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली.
ही घटना १२ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. आरोपीने पीडितेच्या नातेवाईकालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लक्ष्मण सपकाळ (वय २५, रा. सुर्डी, ता. गेवराई) याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण हा दारूच्या नशेत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार पीडित तरुणी मूळची वडवणी तालुक्यातील असून सध्या बीडमध्ये भाड्याच्या घरात राहते. ती आणि आरोपी लक्ष्मण एकाच खासगी रुग्णालयात काम करतात. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण तिच्या घरी सतत चकरा मारत होता.
दरम्यान, १२ मे रोजीही तो मद्यधुंद अवस्थेत तिच्या घरी येण्याचा आग्रह करत होता. पीडितेने त्याला सकाळी येण्यास सांगितले, परंतु त्याने तिचे म्हणणे ऐकले नाही. पीडितेने तक्रारीत सांगितले आहे की, पहाटे लक्ष्मण तिच्या खोलीत जबरदस्तीने घुसला आणि ‘माझा फोन का उचलत नाहीस?’ असे विचारत त्याने तिचा गळा दाबला आणि तिला चापटा-बुक्यांनी मारहाण केली.
मारहाण करताना तो तिला वारंवार जातीवाचक शिवीगाळ करत होता. घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने आपल्या नातेवाईकाला (दाजी) बोलावले असता, लक्ष्मणने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी लक्ष्मण सपकाळविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.