दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा समोर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंडळाच्या अधिकृत परिपत्रकाद्वारे लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे.

तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
दहावीची परीक्षा कधीपासून सुरू होणार?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही मंडळाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होऊन सोमवार, १५ मार्च २०२७ रोजी संपणार आहे.
याशिवाय प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
संपूर्ण वेळापत्रक कुठे पाहाल?
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यार्थी आणि पालकांना www.mahahsscboard.in या वेबसाइटवर जाऊन परीक्षांचे वेळापत्रक पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक तपासून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
