थांब… असा फोटो काढते! हत्येआधी लोहगडवर सियाने केतनला नेमकं कसं उभं केलं? पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर


पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेल्या ५,०५३ पानी आरोपपत्रातून तपासातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला अपघाती मृत्यू असल्याचे वाटत असलेल्या या प्रकरणात, पोलिसांच्या तपासानुसार हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, १८ जून २०२६ रोजी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलण्यात आले. या घटनेपूर्वी हत्येचे नियोजन करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. सिया गोयल केतनला घेऊन लोहगडवर गेली होती. त्याच ठिकाणी त्याला उभे करून तिने विविध अँगलमधून फोटो काढल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

१४ जूनलाही लोहगडवर नेल्याचा दावा

आरोपपत्रातील तपशीलानुसार, १४ जून रोजीही सिया केतनला घेऊन लोहगडवर गेली होती. त्यावेळी त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर १८ जून रोजी पुन्हा लोहगडवर नेऊन हा कट अंमलात आणल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

डिजिटल पुराव्यांमधून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे

या प्रकरणाच्या तपासात मोठ्या प्रमाणावर डिजिटल डेटा पोलिसांच्या हाती लागला. मोबाईल डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे पोलिसांनी विविध डिजिटल पुरावे आरोपपत्रासोबत जोडले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तब्बल १,८०१ चॅटिंग डेटाचा तपास करण्यात आला. त्यातील डिलीट केलेले ११ महत्त्वाचे व्हॉट्सॲप मेसेज फॉरेन्सिक तपासाद्वारे पुन्हा मिळवण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

विविध ॲप्स आणि ऑनलाइन सर्चचाही तपास

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, आरोपींच्या डिजिटल उपकरणांमधील विविध ॲप्स आणि सर्च डेटाचा तांत्रिक तपास करण्यात आला. यामध्ये रिसेंड, व्हॉट्सॲप, नेटिव्ह मेसेज, इन्स्टाग्राम, नॉलेजसी, बायोमी, स्नॅपचॅट, फेसबुक आणि ChatGPT यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उपलब्ध तपशीलानुसार, रिसेंडवरील ४१०, व्हॉट्सॲपवरील ३६७, नेटिव्ह मेसेजमधील २६२, इन्स्टाग्रामवरील २४८, नॉलेजसीवरील १३१, बायोमीवरील १३५, स्नॅपचॅटवरील १२८ आणि ChatGPT वरील ८१ सर्च अथवा संभाषणांचा तपास करण्यात आला. फेसबुकवरील १९ नोंदींचाही तपास करण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, घटनेनंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा आणि संबंधित डिजिटल पुरावे हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फॉरेन्सिक तपासातून मिळालेले फोटो, मोबाईल डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे नेला.

दरम्यान, सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधात खून आणि कटासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असून, अंतिम दोषसिद्धी झालेली नाही. ५,०५३ पानी आरोपपत्रामुळे लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील तपासाचे अनेक पैलू आता समोर आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!