सोलापूरच्या विद्यार्थिनीचं गुणपत्रक पाहून सगळेच थक्क! दहावीच्या निकालात घडला भन्नाट योगायोग

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यंदा एक आगळावेगळा योगायोग पाहायला मिळाला आहे. सोलापुरातील निकिता अमोल कुचेकर हिने सर्व विषयांत समान गुण मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बाळे येथील ज.रा. चंडक प्रशालेची विद्यार्थिनी असलेल्या निकिताने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या सर्व विषयांत प्रत्येकी 35 गुण मिळवले. विशेष म्हणजे हे सर्व गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान मर्यादेइतकेच आहेत. त्यामुळे तिचा निकाल ‘काठावर पास’ म्हणून चर्चेचा विषय ठरला आहे.
निकिताचा निकाल समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक केले असून काहींनी या निकालाला ‘परफेक्ट योगायोग’ असेही म्हटले आहे. शिक्षक, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी देखील तिचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, पुढील शिक्षणात अधिक मेहनत घेऊन चांगले यश मिळवण्याचा निर्धार निकिताने व्यक्त केला आहे. दहावीच्या निकालात अशा प्रकारे सर्व विषयांत समान गुण मिळण्याचा प्रकार दुर्मिळ मानला जात असल्याने हा निकाल राज्यभर चर्चेत आला आहे.
