सुनेत्रा पवारांविरोधात बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांना निवडणूक अधिकाऱ्यांचा दणका; दादांचे नाव आणि फोटोबाबत दिले महत्वाचे आदेश….

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ ते २०३०-३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला वेग आलेला असतानाच पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव, छायाचित्र किंवा प्रतिमा प्रचारासाठी वापरण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणी जय पवार आणि राजवर्धन शिंदे यांनी अधिकृत हरकत नोंदवली होती. पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलकडून प्रचारासाठी अजित पवार यांचे नाव, फोटो आणि प्रतिमा असलेले बॅनर, पोस्टर्स, डिजिटल फलक तसेच स्टिकर्स वापरले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी पुरुषोत्तम जगताप यांना लेखी नोटीस बजावली आहे.

नोटिशीनुसार, अजित पवार यांचे नाव, छायाचित्र किंवा प्रतिमा असलेले सर्व फलक, पोस्टर्स, पत्रके आणि स्टिकर्स प्रचारामध्ये वापरणे तत्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश केवळ प्रत्यक्ष प्रचार साहित्यापुरता मर्यादित नसून मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमधून करण्यात येणाऱ्या प्रचारालाही लागू राहणार आहे.


तसेच आतापर्यंत वापरण्यात आलेल्या अशा सर्व प्रचार साहित्याबाबत योग्य ती कार्यवाही करून त्याचा लेखी अहवाल निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व पॅनेल आणि उमेदवारांनी निवडणूक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील प्रचाराला आता नवे वळण मिळाले आहे.
