एकनाथ शिंदे दिल्लीत; पंतप्रधान मोदींची घेतली भेट, तासभराच्या बैठकीत काय चर्चा?

नवी दिल्ली : संसद भवनात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात झालेली ही बैठक जवळपास तासभर चालली. यावेळी महाराष्ट्रातील विविध महत्त्वाकांक्षी विकासकामे आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेतून एनडीएमध्ये सहभागी झालेल्या नवनिर्वाचित खासदारांशीही संवाद साधला.

खासदारांशी संवाद साधताना मोदी यांनी संसदीय कामकाज आणि राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिला. प्रत्येक राज्याने विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल केली, तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल, असे त्यांनी सांगितले.


महाराष्ट्रासह बंगाल-ओडिशाच्या विकासावर भर
महाराष्ट्र हे देशातील विकसित राज्यांपैकी एक असल्याचे सांगत पंतप्रधानांनी बंगाल आणि ओडिशाच्या विकासाचे महत्त्वही अधोरेखित केले. पूर्व भारताचा विकास हा विकसित भारताच्या संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदारांना उपस्थिती आणि अभ्यासाचा सल्ला
संसदेत नियमित उपस्थित राहण्याच्या सूचना मोदी यांनी खासदारांना दिल्या. सभागृहातील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासोबतच कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
संसदेतील ग्रंथालय आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करा, भारताची संस्कृती, सभ्यता आणि संसदीय लोकशाहीचा अभ्यास करा, अशा सूचनाही पंतप्रधानांनी खासदारांना दिल्या.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून जगाचे लक्ष भारताच्या विकासाकडे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांची जबाबदारी मोठी असून राष्ट्रनिर्माणाच्या कामात पूर्ण ताकदीने योगदान द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.