महापालिका निवडणुकीआधी मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट, काय झाली चर्चा?

मुंबई :राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर सातत्याने प्रहार करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा धामधुमीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. अनौपचारिक भेट असल्याची माहिती समोर आली आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी होते. एकमेकांसमोर आल्यानंतर उभयतांनी स्मितहास्य करत एकमेकांची विचारपूस केली असल्याचे सांगण्यात येत आहे.ही भेट पूर्वनियोजित नसून पूर्णपणे अचानक झाली होती. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ म्हणत आजवर सर्वात जास्त हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही राऊतांना सडेतोड उत्तर दिले जाते. मात्र, आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमधील जुनी मैत्री पाहायला मिळाली.
