दारूच्या नशेत शेतमजूराची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या, थेऊर येथील धक्कादायक घटना…

उरुळी कांचन : दारूच्या नशेत धावत्या रेल्वेखाली उडी मारून एका शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी (ता.४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
राहुल भास्कर पन्हाळ (वय.४३, गाढवे मळा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, पन्हाळ हे कुटुंबासोबत गाढवे मळा परिसरात राहतात. ते शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पन्हाळ यांना दारू पिण्याचेही व्यसन होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पन्हाळे यांनी दारूच्या नशेत दौंड कडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या रेल्वेच्या खाली उडी मारली.
तसेच पन्हाळ यांच्या अंगावरून रेल्वे गाडी गेल्याने त्यांचे तुकडे तुकडे झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी त्वरित महाराज रुग्णवाहिका बोलवली. पोलिसांनी पन्हाळ यांच्या मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कॅम्पातील कमांडो रुग्णालयात पाठविला आहे.