शरद पवार यांच्या भूमिकेवर संशय! उध्दव ठाकरे, नाना पटोलेंनी केली महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू..!!
मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शरद पवारांशिवाय विरोधी आघाडीची मोर्चेबांधणी करण्याचे संकेत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून दिले जात आहे.
त्यानुसार, वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असून पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा १८ ऑगस्टला आढावा घेतला जाणार आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. साहजिकच महाविकास आघाडीचे भविष्यही काहीसे धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या भेटीतही या घडामोडींबाबत चर्चा झाली. त्यामुळे शरद पवार यांना वगळून राजकीय आघाडीची, समीकरणांची तयारी ठेवण्याचा विचार दोन्ही पक्षात सुरू असल्याचे समजते.
त्यातच ठाकरे गटाने राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या चार दिवसात पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. मातोश्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकांना संबंधित मतदारसंघातील साधारण तीस प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यात, संबंधित लोकसभा मतदारसंघासाठीचे संपर्कनेते, स्थानिक उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुखांना बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
बुधवारी नंदुरबार, धुळे, जळगाव आणि रावेर या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. तर, गुरूवारी नगर, नाशिक, दिंडोरी आणि शुक्रवारी मावळ, शिरूर, बारामती, पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शनिवारी पश्विम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.