मोडी-फारसी जाणकारांनो, फोनची वाट पाहू नका; थेट रुग्णालयात या! जरांगेंचं आवाहन, कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोठी मोहीम


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदींचा शोध अधिक व्यापक करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोडी आणि फारसी लिपीच्या अभ्यासकांना थेट पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, अभ्यासकांनी कोणत्याही फोनची वाट न पाहता थेट रुग्णालयात येऊन भेटावं, असं सांगितलं. येत्या २७ सप्टेंबरपर्यंत अभ्यासकांनी आपली माहिती देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

कुणबी नोंदी शोधताना जुन्या कागदपत्रांमधील मजकूर वाचणे, नोंदींचा अभ्यास करणे आणि उपलब्ध कागदपत्रांवरून वंशावळ जुळवणे यासाठी मोडी लिपीची जाण असलेल्या व्यक्तींची गरज असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोडी लिपीचे जाणकार बुधवारपासून रविवारपर्यंत रुग्णालयात येऊन भेटू शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

फारसी अभ्यासकांनाही साद

कुणबी नोंदींच्या शोधासाठी केवळ मोडी लिपीच नव्हे, तर फारसी भाषेच्या अभ्यासकांचीही मदत आवश्यक असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. हैदराबाद संस्थानातील अनेक जुन्या नोंदी आणि कागदपत्रांमध्ये मोडी तसेच फारसी लिपीचा वापर झालेला असल्याने या दोन्हींचं ज्ञान असलेल्या अभ्यासकांनी पुढे यावं, असं त्यांनी म्हटलं. अभ्यासकांची नावं आणि पत्ते घेऊन ती सरकारला देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, संबंधित अभ्यास नसलेल्या व्यक्तींनी गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

ब्रिटिश, निजामकालीन पुराव्यांपासून दिल्लीपर्यंत शोध

जुन्या नोंदींचा शोध घेताना हैदराबाद गॅझेट, ब्रिटिशकालीन आणि निजामकालीन कागदपत्रं तपासण्याची गरज असल्याचं जरांगे यांनी नमूद केलं. पूर्वी ज्या ठिकाणी व्यापार होत होता, जनावरांची खरेदी-विक्री होत होती, तिथल्या नोंदीही तपासण्याची सूचना त्यांनी केली. तुरुंग, रुग्णालये, पुराभिलेख विभाग आणि ग्रंथालयांमध्येही जुने पुरावे उपलब्ध असू शकतात, असं त्यांनी सांगितलं. गरज भासल्यास दिल्लीपर्यंत जाऊन कागदपत्रांचा शोध घ्यावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, त्यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीबाबत विचारलं असता, “आरोपांची चौकशी होऊ द्या, आम्ही सामोरं जायला तयार आहोत,” अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. आंदोलनाच्या काळात मराठा आंदोलकांच्या चौकशा केल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सत्ता कायमस्वरूपी राहत नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!