आता कोणी भेटायला येऊ नका, जर कोणी आला तर त्याला काटच मारणार! तिकीट देणार नाही, छत्रपतीच्या इच्छुकांना अजित पवारांनी थेट सांगितलं…


बारामती : भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या. यावेळी अजित पवारांनी निवडणुकीसाठी सगळ्यांनीच साथ द्या, सहकार्य करा, असे आवाहन केले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याच्या करिता पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, की पृथ्वीराज जाचक हे पाच वर्षासाठी अध्यक्ष म्हणून असतील व इतर उरलेल्या पाच गटातील उमेदवारांपैकी पाच वर्षांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी विचार केला जाईल. इथं पाच वर्ष घाम गाळायचा आहे. तरच चांगलं घडेल व यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करा, साथ द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार म्हणाले, सगळ्यांच्या मुलाखती जाणून घेतल्या आहेत. आता कोणी भेटायला येऊ नका, जर कोणी आला तर त्याला काटच मारणार! तिकीट देणार नाही, असेही दादा म्हणाले. या मुलाखती राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, विचारपूर्वक उमेदवारी जाहीर केली जाणार आहे, ज्यांचा ऊस कारखान्याला आलेला आहे, त्यांचाच उमेदवार मिळेल. यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. ६५ वर्षांमध्ये जेवढे ऊन नव्हते तेवढे सध्या आहे. तरी देखील आपल्या भागामध्ये नीरा डाव्या कालव्याला पाणी येत असल्याने पाण्याची चिंता करू नये.

तसेच ते म्हणाले, ज्यांना उमेदवारी मिळणार नाही तेही ताकतीचे होते, तोडीचेही होते. परंतु जागा कमी असल्यामुळे सर्वांना संधी देता येत नाही. नाहीतर काहीजण उमेदवारी न मिळणाऱ्यांना उचकून देण्याचा प्रयत्न करतील. इतकी वर्षे बरोबर राहिलो काय मिळाले का? असाच पाट्या उचल, अशा प्रकारे काही पण सांगतील.

याकडे कोणी लक्ष देऊ नका. छत्रपती सहकारी साखर कारखाना हा आपल्या प्रपंचाचा व हातभार लावण्याचे काम आहे. आपल्या पुढच्या पिढीचे बरे करण्याचं काम आहे. हे वैभव ५३ गावांना बारामती व इंदापूर तालुक्यातील मिळून सगळ्यांना पुन्हा दाखवायचे आहे.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये कामगारांपासून सर्व काही जे चालत आहे ते सर्व गोष्टी मला माहित आहेत. अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्यात आहेत; परंतु त्यावर मी चर्चा करणार नाही. आता यावर काम करायचं असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!