“सोनं खरेदी करू नका, पेट्रोल जपून वापरा”; मोदींच्या आवाहनानंतर देशभरात चिंतेचं वातावरण


नवी दिल्ली : “पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा आणि परदेशी प्रवास टाळा…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर देशभरात चर्चांना उधाण आलं आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे जगभरात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारतावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, वाढती महागाई आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

हैदराबादमधील जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी देशवासियांना नऊ महत्त्वाच्या सूचना दिल्या. पेट्रोल-डिझेलचा जपून वापर करा, खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवा, पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका, परकीय चलन वाचवा, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा, घरून काम आणि ऑनलाईन बैठकींना प्राधान्य द्या, तसेच परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११० ते १२० डॉलरपर्यंत पोहोचल्याने भारतात महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर रुपयावरही दबाव वाढण्याची भीती आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मोदी यांच्या “सोनं खरेदी टाळा” या आवाहनामुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खरेदीदारांपैकी एक देश मानला जातो. लग्नसमारंभ, गुंतवणूक आणि परंपरेशी जोडलेलं सोनं जर नागरिकांनी खरेदी करणं कमी केलं, तर त्याचा मोठा परिणाम बाजारपेठेवर होऊ शकतो. मात्र, सोन्याची आयात कमी झाल्यास परकीय चलनाची बचत होऊन व्यापार तूट कमी करण्यास मदत होईल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.

दरम्यान, जागतिक तणावामुळे शेअर बाजारातही मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून हजारो कोटी रुपये काढून घेतल्याने आर्थिक चिंता अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत मोदींच्या आवाहनाकडे देशभराचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!