‘मुलगी नको’च्या विकृत मानसिकतेतून उभे राहिलेले रॅकेट; दौंडमध्ये डॉक्टरसह एजंट अटकेत, तपासाचा फास आणखी आवळला


दौंड : दौंड तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून यवत पोलिसांच्या कारवाईत या काळ्या व्यवसायाशी संबंधित आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या रॅकेटनंतर आता पारगाव आणि वासुंदे गावाशी संबंधित धागेदोरे समोर आल्याने तपास यंत्रणांनी संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे.

विशेष तपास पथक (SIT) गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, वैद्यकीय नोंदी आणि आरोपींचे परस्पर संबंध तपासत होते. त्यातून पारगाव येथील डॉक्टर डॉ. सुमंत तुकाराम शितोळे (वय ३८) आणि वासुंदे येथील बापूराव पंढरीनाथ जांबले (वय ५७) यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आल्याने त्यांना २६ जून रोजी अटक करण्यात आली.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भलिंग निदानासाठी महिलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याची साखळी कार्यरत होती. त्यानंतर निवडक महिलांना पारगाव येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये आणले जात असल्याचा संशय आहे. येथे वैद्यकीय नियमांना हरताळ फासत बेकायदेशीर गर्भपात केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकारात काही आरोपींनी वैद्यकीय व्यवसायाचा गैरवापर केल्याचा आरोपही तपास यंत्रणांनी केला आहे.

या रॅकेटमध्ये बापूराव जांबले हा महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गर्भपातासाठी वापरली जाणारी संवेदनशील आणि प्रतिबंधित औषधे तसेच इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे काम तो करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरप्रकाराला आवश्यक असलेली वैद्यकीय सामग्री पुरविण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती का, याचाही तपास सुरू आहे.

शनिवारी दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या कालावधीत आणखी काही महत्त्वाचे पुरावे आणि संबंधित व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुख्य सूत्रधारांसह पडद्यामागे काम करणाऱ्या एजंट, मध्यस्थ आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. स्त्रीभ्रूणहत्या आणि गर्भलिंग निदानासारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्यासाठी तपासाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!