रोहित पवारांना अन्नाचा एक घासही देऊ नका, नाटक कशाला करताय?; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका


पंढरपूर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावरून राज्यातील राजकारण तापले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार आणि उपरोधिक टीका करत हे आंदोलन केवळ दिखावा असल्याचा आरोप केला आहे.

रोहित पवार सध्या पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सरकारसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनावरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “रोहित पवारांचे आंदोलन हे केवळ नाटक करण्यापुरते आहे. त्यांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. नाटक कशाला करताय? हे काय चित्रपटाचे शूटिंग आहे का? की ‘नटरंग’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयारी सुरू आहे?” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.

पडळकर यांनी पुढे आणखी खवचट टिप्पणी करत म्हटले की, “रोहित पवारांनी जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना साखर कारखानदारांकडून योग्य एफआरपी मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावे. माझी सोलापूर जिल्हा पोलिसांना विनंती आहे की, त्यांच्या आंदोलनस्थळी पूर्ण सुरक्षा द्या, पण त्यांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका. त्यांना एक-दोन महिने आंदोलनाला बसू द्या.”

यावेळी त्यांनी पवार कुटुंबावरही निशाणा साधला. “रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान केले आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनीदेखील या आंदोलनावर टीका करत ते निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांनी आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणणाऱ्यांशी चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले असले तरी, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे पंढरपूरातील हे आंदोलन आता केवळ शेतकरी प्रश्नांपुरते मर्यादित न राहता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे केंद्र बनले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!