प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी पतीचा काटा काढला? पत्नीने जमीन विक्रीचा केला सौदा; 10 लाखांत हत्येचा कट, मुजफ्फरनगर पोलिसांचा धक्कादायक खुलासा


मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी प्रवीण उर्फ परविंदर यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 60 तासांत उलगडा केल्याचा दावा केला आहे. पतीकडून होणारी कथित मारहाण आणि दुसऱ्या पुरुषासोबत असलेले प्रेमसंबंध या पार्श्वभूमीवर पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी रेखा, तिचा कथित प्रियकर विकास, राजा उर्फ काला आणि कल्याण सिंह यांना अटक केली आहे.

रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबरपूर गावातील जंगलात 27 सप्टेंबर रोजी प्रवीण उर्फ परविंदर यांचा मृतदेह आढळला होता. त्यांचे वय अंदाजे 50 ते 52 वर्षे होते. सुरुवातीला या हत्येमागे बाहेरील व्यक्तीचा हात असण्याची शक्यता तपासली जात होती. मात्र, घटनास्थळावरील पुरावे, संशयितांची चौकशी आणि तपासातील घटनाक्रमाच्या आधारे पोलिसांचा संशय कुटुंबातील व्यक्तींकडे वळला.

पोलिसांच्या चौकशीनुसार, रेखा आणि विकास यांच्यात 2018-19 पासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. रेखा आणि प्रवीण यांचा विवाह 2006 मध्ये झाला होता. रेखाने पती दारूच्या नशेत दररोज मारहाण करत असल्याचे पोलिसांना सांगितल्याचा दावा आहे. या परिस्थितीला कंटाळून विकाससोबत राहण्याचा निर्णय घेत तिने प्रवीण यांची हत्या घडवून आणण्याचे ठरवल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जमीन विकून 10 लाख रुपये उभे करण्याचा प्लॅन
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येचा कट रचताना रेखाने स्वतःची जमीन तब्बल 10 लाख रुपयांना विकण्याची तयारी केली होती. विकासने त्याच्या ओळखीतील राजा उर्फ काला आणि कल्याण सिंह यांना या कटात सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे. या दोघांना प्रत्येकी 3 लाख रुपये देण्याचे ठरले होते.

या कटामागे आणखी एक आर्थिक कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजा उर्फ काला याच्याकडे प्रवीण यांचे 1.5 लाख रुपये देणे बाकी होते. हे पैसे परत मिळत नसल्याने राजा देखील हत्येच्या कटात सहभागी झाला, असा पोलिसांचा दावा आहे.

जंगलात बोलावलं अन् दोन गोळ्या झाडल्या
27 सप्टेंबर रोजी नियोजित कटानुसार प्रवीण यांना अंबरपूर येथील जंगलात बोलावण्यात आले. त्यानंतर राजा आणि कल्याण सिंह यांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या गोळीबारात प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातही त्यांच्या शरीरात दोन गोळ्या लागल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान पोलिसांनी दोन देशी बनावटीचे कट्टे, काडतुसे, स्विफ्ट कार, घटनेत वापरण्यात आलेला मोबाईल फोन आणि प्रवीण यांची मोटारसायकल जप्त केली आहे. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येमागील घटनाक्रम आणि आरोपींच्या भूमिकेबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!