कोर्टाच्या निकालानंतर तृप्ती देसाई आक्रमक, मुंडेंच्या पापाचा घडा भरला, आता…

पुणे : मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे.
या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबत केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. तृप्ती देसाई म्हणाल्या,”करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या विरोधात न्याय मागण्यासाठी अनेक नेत्यांकडे गेल्या.
अनेक ठिकाणी त्यांनी अर्ज केले. मात्र त्यांना कोणीच मदत केली नाही. त्यानंतर त्यांनी तीन वर्ष न्यायालयीन लढा दिला आणि ही लढाई आता त्या जिंकल्या आहेत. करुणा शर्मा या सातत्याने मी करुणा शर्मा नसून मी करुणा धनंजय मुंडे आहे आणि धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे, असं सांगत होत्या.
तसेच आज कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांना पोटगी देण्याचे देखील आदेश दिला असून धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी ठरविण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा आता भरत आला असून त्यांच्या विरोधातील पहिली कोर्टाची ऑर्डर आहे, जी सकारात्मक आहे.
वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने काम करत होती, ती टोळी आता जेलमध्ये आहे. या प्रकरणांमध्ये मुंडे यांच्यावर विविध आरोप झाले. मात्र त्यांनी नैतिकता दाखवत राजीनामा दिला नाही.
पुढे म्हणाल्या की, मला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायच आहे. धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पत्नीचा छळ करणारा पती तुमच्या मंत्रिमंडळात आहे. त्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवणार आहात का? देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेणे गरजेचे आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहे.