धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; गुन्हा दाखल करण्याची मागणी, नेमकं काय प्रकरण?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परळी येथे मराठा भवनासाठी देण्यात आलेल्या जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला असून, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

श्री दत्त देवस्थान थोरले देवघर संस्थानचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा भवनासाठी देण्यात आलेली २८ गुंठे जमीन ही संस्थानच्या मालकीची असून तिचा बेकायदेशीर ताबा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
परळीमध्ये १४ मे रोजी धनंजय मुंडे यांच्या हस्ते मराठा भवनाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित जागा मराठा भवनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या जमिनीच्या मालकीवरून वाद निर्माण झाला आहे.

संस्थानच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत जमिनीसंबंधीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. सदर जमीन संस्थानच्या मालकीची असल्याचा दावा करत धनंजय मुंडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ, नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि इतर संबंधितांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित जमीन वर्ग-२ इनामी स्वरूपाची असून संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे तिचा ताबा देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास न्यायालयीन लढाईसह रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही संस्थानच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.