मोठी बातमी! तिरुपती मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू, ४० जखमी..

अमरावती : जगभरात प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० भाविक जखमी झाले आहेत.
तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार तिकीट काऊंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तिरुपती देवस्थानाकडून वैकुंठ द्वाराचं दर्शन दहा दिवसांसाठी खुलं करण्यात येणार आहे. त्यासाठी या महिन्याच्या १०, ११ आणि १२ तारखेला वैकुंठ द्वार सर्व दर्शन टोकन जारी केले जाणार आहेत.
गुरुवारी पहाटे ५ वाजल्यापासून टोकन दिले जाणार असल्याची तिरुपती देवस्थान ट्रस्टनं घोषणा केली होती. त्यामुळे हजारो भाविकांनी टोकन घेण्याकरिता गर्दी केली होती. भाविकांना वैरागी पट्टीडा पार्क येथील रांगेत थांबण्याचं आवाहन केल्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाविकांचा मृत्यू झाल्याने तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर त्यांनी घटनेतील जखमींना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा देखील केली आहे.