केतनच्या विरहाने खचले आजोबा; रुग्णालयात उपचारादरम्यान देवीचंद अग्रवाल यांचे निधन

पुणे : लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नातवाच्या निधनाचा जबर मानसिक धक्का सहन न झाल्याने केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल (वय 83) यांचे शनिवारी पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असतानाच केतनच्या हत्येची बातमी समोर आली आणि या धक्क्यामुळे त्यांची तब्येत पुन्हा खालावल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली.

दोन दिवसांपूर्वी प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावरील स्टेटसमध्ये “Miss You Dad” असा भावनिक संदेश शेअर करत वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. केतन आणि सिया गोयल यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे सांगत त्यांनी सियासाठी वाढदिवसाचे भेटवस्तूही घेतल्याचे नमूद केले होते. “आमचं सर्वस्व हिरावलं गेलं आहे. झोपेत आणि जागेपणी केतनचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या मुलाखतीचा व्हिडीओ त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पुन्हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याला सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याचा आरोप आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला. या प्रकरणी दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे. केतनच्या हत्येनंतर आता त्याच्या आजोबांच्याही निधनाने अग्रवाल कुटुंबावर दु:खाचा आणखी एक डोंगर कोसळला आहे.
