अंदमानच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेचा डंका; नृत्य स्पर्धेत पटकावला पहिला क्रमांक


लोणी काळभोर : अंदमान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात लोणी काळभोर येथील देवयानी शिवाजी ननवरे हिने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आपल्या दमदार, देखण्या आणि आकर्षक नृत्य सादरीकरणाच्या जोरावर तिने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. तिच्या या यशामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ननवरे कुटुंबीयांसह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अंदमान येथे ‘अंदमान सांस्कृतिक महोत्सव – कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा भव्य उत्सव या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवातील नृत्य स्पर्धेत देवयानीने आपल्या नृत्यकौशल्याची प्रभावी छाप उमटवत प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला.

देवयानी ही एव्हरेस्टवीर तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांची कन्या असून, ती सध्या एमआयटी, लोणी काळभोर येथे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच नृत्यकलेची आवड जोपासताना तिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या कलागुणांची छाप पाडत तिने लोणी काळभोरचे नाव उज्ज्वल केले आहे.

तिच्या यशामागे नृत्य दिग्दर्शिका मनीषा साठे, सर्वेश्वरी साठे आणि आरती केदारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर आई धनश्री ननवरे यांनी प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन देत तिला भक्कम साथ दिली. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे पाठबळ आणि स्वतःची मेहनत यामुळे देवयानीने यशाचे शिखर गाठले.

देवयानीच्या या यशाने शिवाजी ननवरे यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला असून, तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिक्षणासोबतच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही जागतिक स्तरावर यश मिळविता येते, हे देवयानीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!