तीन अपत्ये असूनही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जिल्हा बँकेच्या मैदानात? राजकारणात मोठी खळबळ….


अहिल्यानगर : तीन अपत्ये असूनही विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं? अशी जोरदार टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

पवार म्हणाले, त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं. एकतर कर्जत-जामखेडमध्ये केवळ मला विरोध करण्यासाठी आणि मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठीच त्यांना पद देण्यात आलं हे सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य आहे.

त्यांना साधे कायदे-नियमही माहित नसतील, तर अशा व्यक्तीला सभापती पदावरून तातडीने हटवून गणपती मंडळाच्या किंवा स्थानिक उत्सव मंडळाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मुक्त करावं. यामुळं सभापतीपदासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची अप्रतिष्ठा आणि महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही, असेही पवार म्हणाले.

एकतर सगळीकडंच राम शिंदे यांचा झेंडा लावला जात असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ‘हाथ खाली और बजाओ ताली…’ अशीच झाली. त्यामुळं त्यांना सभापती पदावरून हटवलं तर किमान कायद्याची जाण असलेल्या हुशार आमदाराला तरी या पदावर काम करण्याची संधी मिळेल, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, सध्या राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ निवडले जाणार असून निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. बँकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी केली असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!