रस्त्यावर तडफडणारी विद्यार्थिनी पाहताच थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा! सुनेत्रा पवारांची तत्परता चर्चेत; बारामतीकर म्हणाले, ‘दादांचा वसा कायम आहे’


बारामती : बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी निघालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ताफ्यासमोर घडलेल्या एका अपघाताने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ताफा पुढे न नेता स्वतः गाडीतून उतरून जखमी विद्यार्थिनीच्या मदतीसाठी धाव घेतल्याने सुनेत्रा पवार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे बारामतीकरांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची आठवण झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

माहितीनुसार, सुनेत्रा पवार या बारामतीतील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होत्या. जळोची एमआयडीसी मार्गावर त्यांचा ताफा पोहोचला असताना एका विद्यार्थिनीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती रस्त्यावर कोसळली. अपघात पाहताच सुनेत्रा पवार यांनी तातडीने ताफा थांबवण्याचे आदेश दिले.

त्या स्वतः घटनास्थळी उतरल्या आणि जखमी विद्यार्थिनीची विचारपूस केली. तिची प्रकृती पाहून कोणताही विलंब न करता तिला तातडीने रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले. केवळ रुग्णवाहिका बोलावून न थांबता, उपचारात कोणताही विलंब किंवा अडथळा येऊ नये म्हणून आपल्या स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांना रुग्णालयात सोबत पाठवत उपचारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुनेत्रा पवार यांच्या तत्पर निर्णयाचे कौतुक केले. अनेकांनी सांगितले की, अपघातग्रस्तांना त्वरित मदत करण्याची शैली दिवंगत अजित पवार यांची ओळख होती. कोणत्याही व्यक्तीला अडचणीत पाहिल्यावर मदतीसाठी तत्काळ धाव घेण्याची त्यांची सवय होती. सुनेत्रा पवार यांच्या कृतीतही त्याच संवेदनशीलतेची झलक पाहायला मिळाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर पवार कुटुंबीयांनी गोजुबावी येथील त्या धावपट्टीजवळ जाऊन श्रद्धांजली वाहिली, जिथे 28 जानेवारी 2026 रोजी प्रचार दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला होता. या वेळी कुटुंबीय आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक संदेशही शेअर केला होता. “पूर्वी हा दिवस आनंदाचा असायचा, आता तो जयंती म्हणून साजरा करावा लागतो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या पोस्टलाही राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

राजकारणापलीकडे जाऊन संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तत्काळ पुढे येणे, हीच खरी लोकप्रतिनिधीची जबाबदारी असल्याचे सुनेत्रा पवार यांच्या या कृतीतून पुन्हा अधोरेखित झाले. बारामतीत घडलेली ही घटना आता केवळ एका अपघातापुरती मर्यादित राहिली नसून, संवेदनशील नेतृत्वाची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!