डिलिव्हरी बॉय की सायबर रॅकेटचा ‘खातेदार’? ७.४२ कोटींच्या फसवणुकीच्या पैशांत पुण्यात ४८ लाखांचा फ्लॅट!

मुंबई : डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने सायबर फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा वापर करून पुण्यात तब्बल ४८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खार पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या पैशांचा माग काढताना या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, अविनाश खरात याला अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार विकास भुजबळ मात्र अद्याप फरार आहे.
पोलिसांच्या तपासात या प्रकरणाची व्याप्ती पाहून धक्का बसला आहे. अविनाश आणि विकास यांनी स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावाने तब्बल २२ बँक खाती उघडली होती. या खात्यांमधून सायबर फसवणुकीची रक्कम फिरवली जात होती. आतापर्यंत या खात्यांमध्ये तब्बल ७ कोटी ४२ लाख रुपये जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या पैशांचा वापर केवळ बँक खात्यांमधून व्यवहार करण्यापुरता मर्यादित नव्हता. अविनाशने याच रकमेतील काही पैसे वापरून पुणे परिसरात ४८ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एका सामान्य डिलिव्हरी बॉयच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार कसे झाले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.


या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा ४.०७ लाख रुपयांच्या ऑनलाइन टास्क फ्रॉडच्या तक्रारीनंतर झाला. पीडित व्यक्तीला टेलिग्रामवरून वर्क फ्रॉम होम आणि पार्ट टाइम टास्कचे आमिष दाखवण्यात आले होते. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले. तक्रार मिळाल्यानंतर खार पोलिसांनी सायबर हेल्पलाइन १९३० तसेच तांत्रिक तपासाचा आधार घेत पैशांचा माग काढला.
तपास पुढे गेल्यानंतर अविनाशच्या नावावर १३ बँक खाती, तर विकास भुजबळच्या नावावर ९ खाती असल्याचे आढळून आले. सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम या खात्यांमध्ये जमा करून पुढे वळती केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानमधील एका मोठ्या सायबर टोळीशी जोडलेले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन टास्क आणि घरबसल्या कामाचे आमिष दाखवणे, त्यानंतर फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांत वळवणे, अशा पद्धतीने हे नेटवर्क कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
फरार विकास भुजबळचा शोध सुरू असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, किती रक्कम व्यवहारातून फिरवण्यात आली आणि राजस्थानमधील टोळीशी त्यांचा नेमका संबंध काय आहे, याचा तपास खार पोलिसांचे विशेष पथक करत आहे.