कलिंगडामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे झाला मृत्यू? पायधुनी प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाने आता नवं वळण घेतलं आहे. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनंतर आत्महत्येची शक्यता अधिक बळावली आहे.

तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी प्रथम उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर तोंडातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्यांनी कलिंगड खाल्ल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, उंदीर मारण्याच्या औषधाचे काही अंश दातांमध्ये अडकले असावेत. त्यानंतर कलिंगड खाताना ते अंश कलिंगडाच्या फोडींना आणि टरफलांना लागले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या संपूर्ण घटनाक्रमामुळे हा केवळ अपघाती विषबाधेचा प्रकार नसून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असू शकतो, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न विषाच्या स्वरूपावर उपस्थित झाला आहे. मृतांच्या शरीरात आढळलेले ‘झिंक फॉस्फेट’ हे सामान्य बाजारात मिळणारे उंदीर मारण्याचे औषध होते की प्रयोगशाळेत वापरले जाणारे अधिक तीव्र आणि कॉन्सन्ट्रेटेड रसायन होते, याचा तपास सध्या सुरू आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, झिंक फॉस्फेट हे अत्यंत विषारी रसायन मानले जाते. ते अधिक प्रमाणात किंवा तीव्र स्वरूपात शरीरात गेल्यास अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हे विष नेमके कोणत्या प्रकारे शरीरात गेले आणि या मृत्यूमागचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिस आणि फॉरेन्सिक पथकांकडून सुरू आहे.