प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी, फोटोही केले व्हायरल, पुण्यातील धक्कादायक प्रकार..
पुणे : प्रेमास नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीचे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट सुरू करून तिचे छायाचित्र प्रसारित केले. तसेच, चाकूचा धाक दाखवत मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. दनान जाफर शेख (वय २१, रा. मिठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी तरुणाने १६ वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. परंतु मुलीने त्याला प्रेमास नकार दिला. त्यामुळे तरुणाने मुलीचे इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट सुरू केले.
त्या मुलीचे छायाचित्र त्यावर प्रसारित केले. तसेच, तिला चाकूचा धाक दाखवून दोन दिवसांत माझ्यासमवेत न आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने फिर्याद दिल्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.