6,600 रुपयांच्या नफ्यासाठी 18 जीवांचा बळी! पुणे दारूकांडातील ‘डेथ फॉर्म्युला’ उघड; तपासात धक्कादायक खुलासे


पुणे : अवघ्या काही हजार रुपयांच्या नफ्यासाठी मानवी जीवांशी खेळ केला जाऊ शकतो, याचे भयावह उदाहरण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारूकांडाने समोर आणले आहे. आतापर्यंत 18 जणांचा बळी घेणाऱ्या या प्रकरणाच्या तपासात एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येत असून, अधिक नफा कमावण्याच्या हव्यासातून संपूर्ण मृत्यूचा सापळाच रचण्यात आल्याचे उघड झाले आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या योगेश वानखेडेने दारूमध्ये घातक मिथेनॉल मिसळून तिचे प्रमाण वाढवले आणि त्यातून अवघा ₹6,600 चा अतिरिक्त फायदा कमावला. मात्र, या पैशांच्या हव्यासाची किंमत तब्बल 18 जणांना जीव गमावून चुकवावी लागली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, योगेश वानखेडेने 9 मे रोजी सुमारे 210 लिटर मिथेनॉल खरेदी केले. त्यानंतर 23 मे रोजी दारूमध्ये त्याचा वापर करून अधिक नफा मिळवण्याचा प्रयोग करण्यात आला. गावठी दारूचे ड्रम आणि पाणी मिसळून दारूचे प्रमाण वाढवण्यात आले. त्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळून तयार करण्यात आलेली दारू विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवण्यात आली.

या संपूर्ण व्यवहारात मिथेनॉल आणि दारू खरेदीसाठी सुमारे 27 हजार रुपयांहून अधिक खर्च झाला. तयार झालेली दारू विविध विक्रेत्यांना विकून सुमारे 33 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली. म्हणजेच या धोकादायक प्रयोगातून आरोपींना अवघा ₹6,600 चा अतिरिक्त नफा मिळाला. मात्र, याच दारूमुळे अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. फुगेवाडी परिसरात ही विषारी दारू साठवून ठेवण्यात येत होती. बाहेरून आणलेली गावठी दारू आणि मिथेनॉल यांचे मिश्रण करून ती विक्रीसाठी तयार केली जात होती. या प्रक्रियेत काही आरोपींनी सक्रिय भूमिका बजावल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

वैद्यकीय अहवालानुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये जवळपास सारखीच लक्षणे आढळून आली. सुरुवातीला मळमळ, उलट्या, तोंडाला फेस येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसली. त्यानंतर शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊ लागले. मिथेनॉलचा परिणाम सर्वप्रथम डोळ्यांच्या नसांवर होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. काही रुग्णांची दृष्टीही प्रभावित झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढे यकृत, मूत्रपिंड आणि हृदयावर गंभीर परिणाम झाल्याने अनेकांचा काही तासांतच मृत्यू झाला.

तपास यंत्रणांच्या मते, उरळी कांचन परिसरातून तयार होणारी गावठी दारू विविध मध्यस्थांमार्फत शहरात आणली जात होती. अधिक नफा कमावण्यासाठी त्यात घातक रसायनांची भेसळ करण्यात आली. त्यानंतर ही दारू फुगेवाडी, खडकी, हडपसर, काळेपडळ आणि इतर भागांतील विक्रेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने मोठी मोहीम हाती घेतली असून, संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. विषारी दारूच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. अवघ्या काही हजार रुपयांच्या नफ्यासाठी 18 निष्पाप जीवांचा बळी गेल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!