7 लाखांत सौदा? अल्पवयीन मुलीचा बळजबरीने बालविवाह; बीडमधील धक्कादायक घटना


बीड : जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा कथितरित्या बालविवाह लावण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आईने केला आहे. एवढेच नव्हे, तर या विवाहासाठी 7 लाख रुपये स्वीकारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, मुलीचे वडील, सावत्र आई आणि इतर नातेवाईकांनी संगनमत करून तिच्या इच्छेविरुद्ध हा विवाह लावला. या प्रकाराला विरोध केल्यावर आपल्याला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी महिला व बालविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, विवाहाचे व्हिडिओ पुरावेही सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, 11 जून 2026 रोजी शिरूर तालुक्यातील मांगेवाडी येथील या मुलीचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिफळ येथे विवाह लावण्यात आला. मुलीची जन्मतारीख 15 जानेवारी 2011 असल्याने विवाहाच्या वेळी ती अल्पवयीन होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच, मुलाच्या कुटुंबाकडून 7 लाख रुपये घेऊन हा विवाह करण्यात आला, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या आईने केली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. काही अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, ग्रामविकास अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि महिला व बालविकास विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत, बालविवाह रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी असून संबंधित यंत्रणांकडून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. या प्रकरणामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!