सासऱ्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर, पैशांवरही बंधनं; अखेर सुनेने रचला 6 लाखांचा हत्येचा कट, 330 कॉल्सने उलगडलं गूढ

कानपूर : करोडोंची संपत्ती, प्रसिद्ध औषध व्यवसाय आणि आलिशान आयुष्य… मात्र घरातील पैशांवरील नियंत्रण आणि खासगी आयुष्यातील कथित हस्तक्षेप एका कुटुंबासाठी काळरात्र ठरला. कानपूरचे प्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मिनोचा (63) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची सून शालू मिनोचा (30) हिला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सासऱ्याच्या हत्येसाठी शालूने घरातील नोकर विशाल गौतम याला कथितपणे 6 लाख रुपयांची सुपारी दिली.
5 सप्टेंबरच्या रात्री विनीत मिनोचा यांची त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये हत्या झाली. त्यांच्या शरीरावर चाकूने 26 हून अधिक वार करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांसमोर वेगळे चित्र उभे राहिले होते. मात्र तपासात घरातील कौटुंबिक तणाव आणि आर्थिक वादाचे धागेदोरे हाती लागले आणि प्रकरणाला अचानक नवे वळण मिळाले.

करोडपती घरातही पैशांसाठी संघर्ष?


पोलिसांच्या माहितीनुसार, विनीत मिनोचा मुलगा सुब्रत आणि सून शालू यांच्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवत होते. प्रत्येक खर्चाचा हिशोब घेतला जात असल्याने शालू नाराज होती. मुलगा आणि सुनेलाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पगाराच्या स्वरूपात पैसे दिले जात असल्याचे सांगण्यात येते. त्यातच घरातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने आपल्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात असल्याची भावना शालूच्या मनात होती.
पार्ट्या करण्यास परवानगी नसणे, खर्चासाठी मर्यादित पैसे मिळणे आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप होत असल्याची नाराजी वाढत गेली. याच पार्श्वभूमीवर शालूने सासऱ्याला मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
330 कॉल्सने वाढवला पोलिसांचा संशय
तपासादरम्यान शालू, तिचा पती सुब्रत आणि नोकर विशाल यांच्यातील मोबाईल संपर्क पोलिसांच्या रडारवर आला. 21 दिवसांत या तिघांमध्ये तब्बल 330 कॉल्स झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे, 29 ऑगस्टपासून हत्येच्या रात्रीपर्यंत विशाल आणि सुब्रत यांच्यात 25 वेळा, तर विशाल आणि शालू यांच्यात 14 वेळा संभाषण झाले. म्हणजेच हत्येपूर्वीच्या आठ दिवसांत या जोडप्याचा विशालशी 39 वेळा संपर्क झाला होता.
इतकेच नव्हे तर हत्या घडत असतानाही शालू आणि विशाल यांच्यात व्हॉट्सॲपवरून तीन वेळा संवाद झाल्याचे तपासात आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संपर्कामुळे हत्येचा कट आधीच आखला गेला होता का, याचा तपास केला जात आहे.
सुब्रतच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
विनीत मिनोचा यांच्या हत्येत केवळ सून शालूच नव्हे, तर त्यांचा मुलगा सुब्रतही सहभागी होता का, याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतरही सुब्रतने विशालची ओळख पटवण्यास नकार दिल्याची माहिती आहे. पत्नीचा कथित सहभाग आणि वडिलांची हत्या झाल्यानंतरही त्याच्या भूमिकेबाबत काही प्रश्न अनुत्तरित असल्याने पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे.
दरम्यान, हत्येनंतर नातेवाईक घरी आल्यानंतर शालू रडत असल्याचेही तपासात समोर आले आहे. आता सुपारीची रक्कम, हत्येची आखणी, विशालच्या साथीदाराची भूमिका आणि सुब्रतचा कथित सहभाग या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे कानपूरमधील या हत्याकांडात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे लक्ष लागले आहे.