लग्नात डीजेवर नाचणं पडलं महागात! गुलाबराव पाटलांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “एका कानाने 40 टक्के ऐकू येत नाही”


जळगाव : गणेशोत्सव जवळ येत असताना राज्यात डीजेच्या वापरावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अनेक ठिकाणी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध होत असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःचाच अनुभव सांगत या मुद्द्याला वेगळे वळण दिले आहे. डीजेमुळे आपल्या एका कानाची ऐकण्याची क्षमता तब्बल 40 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा त्यांनी केला.

पाटील जळगावमध्ये पोळा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या पुतण्याच्या लग्नातील प्रसंग सांगितला. लग्नासाठी मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. नातेवाईकांनी आग्रह केल्यानंतर पाटील नाचण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी डीजेचा मोठा आवाज सतत कानावर पडल्याने त्यांना त्रास झाला. या घटनेनंतर एका कानाने सुमारे 40 टक्के कमी ऐकू येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, काही जणांनी कानासाठी श्रवणयंत्र वापरण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ते वापरल्यास आपल्याला बहिरेपणाची जाणीव होईल, असे वाटल्याने आपण श्रवणयंत्र लावले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या अनुभवातून त्यांनी तरुणांना आगामी गणेशोत्सवात डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन केले.

गुलाबराव पाटील यांनी केवळ स्वतःच्या त्रासाचा उल्लेख केला नाही, तर डीजेच्या आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांकडेही लक्ष वेधले. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनाही मोठ्या आवाजामुळे त्रास होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. डीजेसोबत वापरल्या जाणाऱ्या प्रखर प्रकाशझोतामुळे डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव काळात डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरसह काही जिल्ह्यांनी डीजेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मात्र, पुण्यात डीजे बंदीचा प्रश्न अद्याप कायम आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात विद्यानंद बापट यांच्यासह अनेक पुणेकरांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

सरकारकडून गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी राज्यभर डीजे बंदीबाबत अद्याप एकसंध धोरणात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे “डीजेचा जल्लोष की नागरिकांचे आरोग्य?” हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच एका मंत्र्याने स्वतःच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचा अनुभव सांगितल्याने डीजे बंदीच्या मागणीला आणखी जोर मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!