धक्कादायक प्रकार! क्रिकेटपटूंनी बाथरूममध्ये महिला डॉक्टरांचे गुपचूप व्हिडिओ काढले; घटनेने उडाली खळबळ

नवी दिल्ली/कोलंबो : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. १९ वर्षांखालील राष्ट्रीय संघाशी संबंधित दोन युवा खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे.

या दोघांवर महिला डॉक्टरांचे स्वच्छतागृहात गुपचूप व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे खेळाडूंच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही घटना श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील नाराहेनपिता परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये घडल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. एका व्यावसायिक परिषदेसाठी अनेक महिला डॉक्टर या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या.

माहितीनुसार, आरोपींनी स्वच्छतागृहातील भिंतीतील फटींचा गैरफायदा घेत महिलांचे गुपचूप चित्रीकरण केले. काही प्रकरणांमध्ये पुरुषांचेही व्हिडिओ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच नाराहेनपिता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे.
दोन्ही आरोपींना हल्ट्सडॉर्प दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सुमारे १,५६४ अमेरिकन डॉलरच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून, २५ मे रोजी पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिस फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून मोबाईल डेटा तपासत असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.