अंगात त्राण नाही, उपोषणामुळे अशक्तपणा; तरीही जरांगे मुंबईच्या वाटेवर! ‘मी मेलो तर फडणवीस जबाबदार’ म्हणत सरकारला थेट इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून, अंगात त्राण नसल्याचं ते स्वतः सांगत आहेत. अशा अवस्थेतही समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही आपण मुंबईला जाणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी प्रकृतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर भावनिक प्रतिक्रिया दिली. अन्न सोडलं असून पाणीही घेत नसल्यामुळे अशक्तपणा जाणवत आहे, असं सांगण्यात आलं. त्यावर समाजाच्या लेकरांसाठी आपण हा लढा देत असून, “समाजाच्या लेकराला मोठं करायचं आणि मरायचं,” अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे प्रकृती खालावत असतानाही आंदोलन मागे घेण्याचा त्यांचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात ५० लोकांसह उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, वाहतूक कोंडी आणि गर्दीचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी कारणं पोलिसांकडून देण्यात आली आहेत.


परवानगी नाकारल्याबाबत जरांगे पाटील यांनी पोलिसांच्या भूमिकेला विरोध केला. न्यायालयाने उपोषणापासून कोणालाही रोखता येणार नाही, असं सांगितल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे परवानगी मिळाली नाही तरी मुंबईकडे जाण्याचा निर्णय बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी त्यांनी समाजाला सध्या संयम बाळगण्याचं आवाहन करत आपण स्वतः मुंबईला जाणार असल्याचं म्हटलं होतं.
मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासाबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. पाटण, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोलीमार्गे आझाद मैदानात पोहोचण्याचं नियोजन आहे. मात्र, खोपोलीचा टप्पा वगळला जाऊ शकतो, त्यामुळे तिथे मुक्काम होईलच असं नाही, असं जरांगे यांनी सांगितलं. त्यांच्या नियोजनानुसार १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची भूमिका आहे.
सरकारने वाटेत येऊन चर्चा केली तर काय भूमिका असेल, असा प्रश्न विचारण्यात आला असता जरांगे यांनी केवळ चर्चेवर समाधान मानणार नसल्याचं स्पष्ट केलं. सरकारने मागण्यांची अंमलबजावणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. समाजातील लोक आशीर्वाद देण्यासाठी येतील; मात्र सर्वजण आंदोलनात सहभागी होणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
याचवेळी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. “मी मेलो तर देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,” असं विधान त्यांनी केलं. काहीही ठोस निर्णय झाल्याशिवाय आपण थांबणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याआधीही जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, फडणवीस यांनी सरकारने मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्याचं सांगत काही मागण्या कायदेशीर किंवा तथ्यात्मक कारणांमुळे मान्य करता येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
एकीकडे प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगे मुंबईत पोहोचल्यानंतर आंदोलनाचं स्वरूप काय असेल, सरकारकडून चर्चा केली जाते का आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर पुढे काय निर्णय होतो, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.