कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते! राज ठाकरेंची सूचक पोस्ट चर्चेत; नेमका रोख कुणाकडे?

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य काल एकत्र आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ठाकरे कुटुंबातील सदस्यांची काही खास क्षणचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे मंगल पर्व सुरू असतानाच मंगळवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक सूचक पोस्ट केली. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते… तूर्तास एवढेच…’ अशी पोस्ट त्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? त्यांनी ही पोस्ट कुणाला उद्देशून केली आहे? त्यांच्या पोस्टचा रोख नेमका कुणाकडे आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील मुंबईत होते. सोमवारी त्यांनी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सहकुटुंब गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले.


अमित शाहांच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंची पोस्ट?
राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्र हे ‘बहुभाषिक राज्य’ असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टचा रोख अमित शाह यांच्या वक्तव्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली.
‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच…’ असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य असल्याचे केलेले वक्तव्य राज ठाकरे यांच्या भूमिकेला खटकले असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे यांनी अनेकदा महाराष्ट्र हे मराठी माणसांचे आणि मराठी भाषिकांचे राज्य असल्याचे ठामपणे सांगितले आहे. मराठीसोबत इतर भाषा शिकण्यास आमचा विरोध नाही, मात्र कोणत्याही भाषेची सक्ती करू नये, अशी भूमिका त्यांनी अनेकदा मांडली आहे.
मराठीच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही राज ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन ‘हे राज्य बहुभाषिक आहे’ असे वक्तव्य केल्याने राज ठाकरे यांनी अमित शाह यांना उद्देशूनच ही पोस्ट केली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली मराठी भाषा कधीही संपणार नाही, असा संदेशही या पोस्टमधून देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
वाशी येथे राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंदी दिवस-२०२६’ कार्यक्रमात अमित शाह यांनी महाराष्ट्रातील विविध भाषांचा उल्लेख केला. महाराष्ट्रात हिंदी, कोकणी, गुजराती, सिंधी आणि कन्नड अशा अनेक भाषांचा विकास झाला असून, या सर्व भाषांचा सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे बहुभाषिक राज्य असल्याचे त्यांनी म्हटले.
त्याचवेळी महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांची एकजूट आणि त्याचवेळी राज ठाकरे यांची सूचक फेसबुक पोस्ट यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून नेमका कोणाला इशारा दिला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.