नगरसेवकांची पळवा पळवी!आता काँग्रेसचे ३० नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; तातडीने अज्ञात स्थळी रवाना

पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असून महापालिका निवडणुकानंतर आता सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. याआधी शिंदे सेनेने आपले नगरसेवक अज्ञातस्थळी पाठवले होते.त्यानंतर आता काँग्रेसचे 30 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवकांची फोडाफोडी होण्याची भीती लक्षात घेऊन काँग्रेसने तातडीने हालचाली केल्या. सर्व ३० विजयी नगरसेवकांनी कोकण भवन येथे आपली अधिकृत नोंदणी पूर्ण केली. ही प्रक्रिया संपताच या सर्व नगरसेवकांना बसने अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले, तरी सत्तेसाठी चढाओढ सुरू झाली आहे. ९० जागांच्या सभागृहात ३० जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताचा ४६ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर, आपल्या नगरसेवकांची जुळवाजुळव टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसने खबरदारी घेतली असून विजयी नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. सत्तेच्या शर्यतीत नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पक्षाने ही ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
