पाच वर्षांसाठी निवडणूक लढवली पण मिळाली 10 वर्षे! संचालकांची दिवाळी, छत्रपती कारखाण्याची निवडणूक होणार तरी कधी? सभासदांमध्ये तीव्र नाराजी…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अनेक कारणाने लांबली आहे. यामुळे ही निवडणूक होणार तरी कधी असा प्रश्न सभासदांना पडला आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाला पाच वर्षाच्या कार्यकालावर वाढीव पाच वर्षाचा कार्यकाल मिळाला आहे. यामुळे 5 वर्षांसाठी लढवलेल्या या निवडणुकीत संचालकांना जवळपास 10 वर्ष मिळाली आहेत.
ही निवडणूक रखडल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजी, निवडणूक न झाल्यास विद्यमान संचालकांना दिवाळीपर्यंत आणखी वाढीव कार्यकालाचा बोनस मिळण्याची शक्यता. सध्या कारखाना देखील आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. अशातच निवडणूक लांबत आहे. कोरोना पावसाळ्याचा कालावधी तसेच सभासदांच्या यादीवरील आक्षेप क्रियाशील अक्रियाशील सभासदात्वाचा मुद्दा, अशी अनेक कारणे लांबलेल्या निवडणुकीसाठी आहेत.
तसेच सुरू असलेली न्यायालयीन लढाई, तीन वेळा पार पडलेली मतदार यादीची प्रक्रिया तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा कालावधी या व विविध कारणामुळे आजवर विद्यमान संचालक मंडळाला जवळपास पाच वर्षाच्या कार्यकालावर पाच वर्षाचा वाढीव कार्यकाल मिळाला आहे. यामुळे पहिल्यांदाच असा इतिहास घडला आहे.
दरम्यान, आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका यासोबत होणार की मनुष्यबळ नसल्याचे कारण देत लांबणार हे लवकरच समजेल. तसेच जून पासून पावसाळ्याचा कालावधी सुरू होणार असल्याने जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात सहकारी संस्थांना संस्थांच्या निवडणुकांना सहकार खात्याच्या वतीने स्थगिती दिली जाते.
यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून निवडणूक लवकरात लवकर व्हावी, अशी सभासदांची इच्छा आहे. मध्यंतरी अनेक इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या होत्या. मात्र त्यांच्याही लक्षात आल्याने पुन्हा एकदा ही निवडणूक लांवल्याने त्यांनी देखील भेटीगाठी कमी केल्या आहेत. आता प्रत्यक्षात निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.