मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अचानक स्लॅब कोसळला; ७ जण ढिगाऱ्याखाली, परिसरात खळबळ


सांगली : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात आज भीषण दुर्घटना घडली. रुग्णालयाच्या नूतन प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत सात जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. प्राथमिक माहितीनुसार, यातील दोघांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

काम सुरू असतानाच अचानक कोसळला स्लॅब

मिरज सिव्हिल रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नूतनीकरण आणि नवीन कमान उभारण्याचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच कमानीचा मोठा स्लॅब अचानक कोसळला. स्लॅब कोसळल्याचा मोठा आवाज होताच रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांचीही काही काळ पळापळ झाली.

स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

अग्निशमन दल, पोलिसांकडून बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच मिरज अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले.

जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी

या दुर्घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि बांधकामातील हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे सांगली-मिरज परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सार्वजनिक बांधकामांच्या सुरक्षेचा आणि बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!