प्रवाशांचे हाल होणार! रिक्षा व्यावसायिकांचा येत्या सोमवारी राज्यव्यापी बंद; कोणत्या मागण्यांसाठी पुकारला बंद? वाचा सविस्तर..

मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, घटते उत्पन्न आणि वाढता खर्च यामुळे चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाची धोरणे, इंधन दरवाढ, ई-बसेस आणि ॲपआधारित बाईक टॅक्सी सेवेमुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील रिक्षाचालकांनी सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय बंद पुकारला आहे.
या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षाचालकही सहभागी होणार आहेत. विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत.

रिक्षा व्यवसायात ७५ ते ८० टक्क्यांची घट?

रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या तुलनेत व्यवसायात तब्बल ७५ ते ८० टक्क्यांची घट झाली आहे. दिवसभर काम करूनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने रोजचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. कोल्हापूर शहरात ई-बसेसची संख्या वाढल्याने प्रवासी सार्वजनिक वाहतुकीकडे वळत आहेत. त्यातच अॅपआधारित बाईक टॅक्सीमुळे कमी अंतराच्या प्रवासासाठी रिक्षांना प्रवासी मिळणे अवघड झाल्याचा दावा चालकांनी केला आहे.

काही रिक्षाचालकांना दिवसाला ३०० ते ४०० रुपये मिळवणेही कठीण जात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे खर्च वाढला असून, उत्पन्न घटल्याने चालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दंडवाढ आणि ATS तपासणीवर रिक्षाचालकांची नाराजी
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास पूर्वी ५० रुपये दंड आकारला जात होता, तर आता काही उल्लंघनांसाठी ५०० ते १,५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जात असल्याची तक्रार रिक्षाचालकांनी केली आहे.
याशिवाय, आरटीओच्या ट्रॅकवर ATS अर्थात ऑटोमॅटिक टेस्टिंग मशीनद्वारे वाहनांची तपासणी केली जाते. वैध PUC प्रमाणपत्र असूनही काही रिक्षा या तपासणीत अकार्यक्षम ठरत असल्याचा आरोप चालकांनी केला आहे. या तपासणीसाठी ८०० रुपये शुल्क आणि निकाल नकारात्मक आल्यास पुन्हा ६०० रुपये भरावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिक्षांना ATS तपासणीतून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या काय?
रिक्षा संघटनांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत.
ॲपआधारित बाईक टॅक्सी सेवा बंद करावी.
ई-रिक्षांसाठी परमिट बंधनकारक करावे.
रिक्षांना ATS मशीनच्या तपासणीतून वगळावे.
आनंद दिघे रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाची योग्य अंमलबजावणी करावी.
या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात किती रिक्षा?
उपलब्ध आकडेवारीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात २४ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. त्यापैकी १३ हजार रिक्षा कोल्हापूर शहरात आहेत. जिल्ह्यात ३ हजार स्कूल रिक्षा असून, त्यातील २ हजार रिक्षा शहरात आहेत. तसेच, जिल्ह्यात ५ हजार वडाप रिक्षा असून, शहरात त्यांची संख्या अंदाजे २ हजार ५०० ते ३ हजार आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे सचिव चंद्रकांत भोसले यांनी शासनाकडून रिक्षाचालकांना अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तर महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव यांनी व्यवसायातील आर्थिक अडचणींबाबत चिंता व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बंदमुळे कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांतील रिक्षा सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी बाहेर पडण्यापूर्वी स्थानिक रिक्षा संघटनांकडून बंदाबाबतची माहिती घ्यावी.
