‘गार्गी’च्या उपचारासाठी सामाजिक भावना ऐकवटवली; लोणीकाळभोर मध्ये हॉटेल व्यावसायिकाने थाळी मागे दहा रुपयांची मदत; ९ कोटी उपचार खर्चाला मदतीचा ओघ कायम..


उरुळीकांचन : दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या गार्गीच्या उपचारांसाठी तब्बल नऊ कोटी रुपयांची गरज असल्याने तिच्या मदतीसाठी समाजातील विविध स्तरांतून हात पुढे येत आहेत. या मदत मोहिमेत हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील ‘आई जगदंब’ हॉटेलनेही सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

हॉटेलमध्ये विक्री होणाऱ्या प्रत्येक थाळीमागे दहा रुपये गार्गीच्या उपचारांसाठी देण्यात येत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे. हॉटेलमध्ये दररोज सुमारे २०० ते ३०० थाळ्यांची विक्री होते. त्यामुळे प्रत्येक थाळीमागे दहा रुपये याप्रमाणे दररोज सुमारे दोन ते तीन हजार रुपये गार्गीच्या मदतीसाठी जमा होत आहेत. ही रक्कम एकत्रित करून गार्गीच्या उपचारांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती हॉटेलचे मालक लालासाहेब यादव चौधरी यांनी दिली.

“गार्गीच्या उपचारांसाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न आहे. ग्राहकांनी घेतलेल्या प्रत्येक थाळीतून दहा रुपये तिच्या उपचारांसाठी दिले जात आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन गार्गीला मदत करावी,” असे आवाहन चौधरी यांनी केले.

गार्गी अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर आजाराशी झुंज देत असून, तिच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार उपचारांसाठी सुमारे नऊ कोटी रुपयांची गरज आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे आव्हानात्मक असल्याने दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या मदतीतून निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एका थाळीमागे अवघे दहा रुपये असले, तरी अनेक हात एकत्र आल्यास त्यातून मोठी मदत उभी राहू शकते, या भावनेतून ‘आई जगदंब’ हॉटेलचा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे हा उपक्रम आर्थिक मदतीसोबतच सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरत आहे.

“गंभीर आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत सामूहिक निधी संकलनासह सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. समाजातील संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन मदतीचा हात दिल्यास गार्गीच्या उपचारांसाठी आवश्यक निधी उभारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गार्गीच्या उपचारांसाठी पुढे येऊन शक्य ती मदत करावी.”

युवराज काकडे , -सभापती पंचायत समिती, हवेली

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!