अमित शाहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप? सुनेत्रा पवारांची आमदारांना तातडीची हाक; देवगिरीवरील बैठकीत कोणता निर्णय होणार?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नेमके काय घडत आहे आणि या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची भावना या नेत्यांनी शाह यांच्यासमोर मांडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबतही काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, या भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवर मतभेद आहेत, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उद्या, ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, तब्बल चार महिन्यांनंतर पक्षाच्या सर्व आमदारांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

अर्थखात्याचा मुद्दाही चर्चेत?

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या अर्थखात्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अर्थखाते सध्या भाजपकडे आहे. हे खाते पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे, अशी मागणी किंवा त्यासंदर्भातील चर्चा बैठकीत झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडत असताना सुनेत्रा पवार यांनी दुसऱ्याच दिवशी सर्व आमदारांना एकत्र बोलावले आहे. त्यामुळे कोअर कमिटीतील चर्चा आणि आमदारांच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयांचा परस्पर संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाराजी दूर होणार की पक्षात नवी समीकरणे?

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याबाबत झाल्याची चर्चा, तसेच अर्थखात्याचा मुद्दा या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. उद्याच्या बैठकीत आमदारांशी संवाद साधून पक्षातील नाराजीवर तोडगा काढला जाणार का, संघटनात्मक पातळीवर काही बदल होणार का, की अन्य महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला जाणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अर्थात, बैठकीचा अधिकृत विषय आणि संभाव्य निर्णय अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. मात्र, चार महिन्यांनंतर होणारी आमदारांची बैठक आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर घडलेल्या या हालचाली पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!