राज्यात लवकरच आचारसंहिता लागणार; निवडणुकांची घोषणा होणार?, समोर आली मोठी माहिती…

पुणे : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरु झाली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता राज्य निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बुधवारी (५ नोव्हेंबर) आयोग पत्रकार परिषद घेणार असून त्याच दिवशी राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यभर आचारसंहिता लागू होईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तीन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, या पत्रकार परिषदेतून राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे. आयोगाकडून निवडणुकीची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली असून, प्रभाग आणि आरक्षणासंबंधी आवश्यक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.
निवडणुका जाहीर होण्याआधीच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या मते, मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त न करता निवडणुका घेणे अनुचित ठरेल. मात्र, निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका तीन टप्प्यांत घेण्यात येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या टप्प्याचा कालावधी २१ दिवसांचा असेल आणि यात २८९ नगरपालिकांचा समावेश असेल.
