ढगाळ वातावरण पण पावसाची दांडी! उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा; पुढील 4 दिवस पावसाचा इशारा, यलो अलर्ट जारी..


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना हवामानाचा अजब अनुभव येत आहे. दिवसभर कडक ऊन आणि प्रचंड उकाडा, तर सायंकाळी काळेभोर ढग दाटून येतात. मात्र, पावसाची अपेक्षा असतानाही ढग बरसत नसल्याने नागरिकांची निराशा होत आहे.

सकाळपासून जाणवणाऱ्या उष्णतेमुळे आणि वाढत्या आर्द्रतेमुळे शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. मात्र, आता पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असून पुण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

शनिवारी (६ जून) शहरातील कमाल तापमान सुमारे ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दुपारच्या सुमारास उकाड्याचा तीव्र त्रास जाणवत होता. सायंकाळी हवामानात अचानक बदल होऊन ढगांची गर्दी झाली, मात्र अनेक भागांत पाऊस न पडल्याने उष्णता आणि दमटपणा आणखी वाढला.

हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस सकाळी आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ स्थिती निर्माण होईल. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काही दिवस पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!