नागरिकांच्या सतर्कतेने चमत्कार! हरवलेला चिमुकला परत आई-वडिलांच्या कुशीत…

लोणी काळभोर : रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारांस तिन वर्षे वयाचा मुलगा खेळता खेळता पहिल्या मजल्यावरून खाली उतरला. परंतु परत घरी परतण्याचा रस्ता त्याला सापडला नाही. म्हणून तो थेट पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर धावत सुटला परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत सुरक्षित पोहोचला.

सदर घटना हवेली तालुक्यातील कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील आहे. हॉटेल व्यावसायिक स्वप्नील कदम आणि इजाज खान हे आपले हॉटेल बंद करून गुरुवार (१६ एप्रिल) रोजी रात्री घरी जात होते. अचानक त्यांना चिमुकला अंधारात एकटाच रस्त्यावर, धावताना दिसला. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चिमुकला घाबरला व जोराने धावू लागला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्याला “चल, चॉकलेट देतो, चिप्स देतो” असे खाऊचे अमिश दाखवले. तेव्हा तो थांबला.
दोघांनी त्याच्याशी गोड बोलून संवाद साधला परंतु तो काहीच सांगू शकत नव्हता. त्यांनी तात्काळ सदर माहिती लोणी काळभोर पोलिस ठाण्यात माहिती दिली. काही वेळात पोलीस अंमलदार महेंद्र आगळे आणि गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोधमोहीम सुरू झाली. अखेर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या चिमुकल्याच्या आई-वडिलांचा शोध लागला.

त्याचा शोध घेत असताना आई-वडिलांची अवस्थाही खराब झाली होती. मुलगा सापडत नाही या काळजीने त्यांचा जीव कासावीस झाला होता. पण जेव्हा त्यांनी आपल्या चिमुकल्याला सुरक्षित पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
पोलिसांनी खात्री करून चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.

या संपूर्ण घटनेत स्वप्नील कदम आणि इजाज खान यांनी दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद आहे. त्यांच्या एका क्षणाच्या जागरूकतेमुळे एक निरागस जीव वाचला. कारण ते बाळ महामार्गावर गेले असते तर अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे लोणी काळभोर परिसरात या दोघांचे कौतुक होत आहे. कारण त्या रात्री एका चिमुकल्यासाठी त्यांनी देवदूताचे काम केले.