मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांना टाकले मागे; महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मोठी नोंद

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत राज्यातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

१२ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ २,४३० दिवसांचा झाला आहे. याच कालावधीत त्यांनी शरद पवार यांच्या २,४१२ दिवसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाला मागे टाकले आहे. फडणवीस यांचा सध्याचा कार्यकाळ सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढत आहे.
देवेंद्र फडणवीस आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी पहिल्यांदा सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले. २०१९ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र हा कार्यकाळ केवळ सहा दिवसांचा ठरला. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली.

दरम्यान, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र त्यांना एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्या चारही कार्यकाळांचा शेवट विविध राजकीय घडामोडींमुळे मुदतपूर्व झाला.

महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते
वसंतराव नाईक – ४,०९६ दिवस
विलासराव देशमुख – २,६८६ दिवस
देवेंद्र फडणवीस – २,४३० दिवस
शरद पवार – २,४१२ दिवस
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीच्या बाबतीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ सुरू असल्याने या विक्रमात भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.