Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखं महाराष्ट्रात येणार, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

Chhatrapati Shivaji Maharaj मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रम आणि त्यांच्या शौर्याच्या गाथा आजही मनामनामध्ये स्फुल्लिंग चेतवतात. अफझलखानाचा महाराजांनी केलेला वध आणि त्यासाठी वापरलेली `वाघनखे`, हा इतिहासकारांच्या अभ्यासात नेहमीच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. आता हीच `वाघनखे`, ब्रिटनमधून भारतात आणण्यात येणार आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये विजापूरच्या आदिलशाहचा सेनापती अफझल खान याला ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनखं परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवल्याने महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) येत्या काही दिवसांत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार असल्याची माहिती आहे.
शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा वध केला ते वाघनखं सध्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले तर, शिवाजी महाराजांचे प्रसिद्ध वाघनखं काही महिन्यांतच महाराष्ट्रात येऊ शकतील.
आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे पत्र मिळाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघनखं परत देण्याचे मान्य केले आहे. हिंदू कॅलेंडरच्या आधारे शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले त्या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला ते परत मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे मुनगंटीवार म्हणाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं हा इतिहासाचा अमूल्य ठेवा असून, त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही वाघनखं महाराष्ट्रात येणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी ऐतिहासिक घटना ठरणार आहे.